Sale!

सांगड (कादंबरी ) लेखक डॉ. राजेंद्र मलोसे

480.00

सांगड
लेखक : डॉ. राजेंद्र मलोसे
देशमुख आणि कंपनी, पुणे
पृष्ठे : 355, मूल्य 500 रुपये

5 in stock

Category: Tags: ,

Description

सांगड : तत्त्व आणि व्यवहार यांची

कथानकातील काळ महिन्याभराचा आहे. सांगड घालण्याच्या घटितांचे प्रमाणही मर्यादित आहे. वर्तमान वास्तव विचारात घेतले तर डॉक्टरांचे भावविश्व, जीवनदृष्टी, शिक्षणविषयक दृष्टी, भौतिक परिस्थिती यांत मोठेच अंतर पडलेले दिसते. पण 40-42 वर्षांपूर्वीची नव्या ध्येयवादी डॉक्टरची जीवनदृष्टी- सांगड घालण्याची जिद्द मात्र महत्त्वाची वाटते. तत्कालीन सामाजिक परिस्थिती-विविध समाजघटक-गट यांतील गुंतागुंत, स्तरभेद यांचे लेखकाचे आकलन ढोबळ असण्याचीही कथाशयाची मर्यादा आहे. मुस्लिम- मारवाडी-ग्रामीण शेतकरी समाजजीवन, आमदाराचे राजकीय जीवन, मारवाडी कुटुंबसंस्था यांचे बाह्य दर्शन या कादंबरीतून घडते. स्त्रीजीवनही क्षीण स्वरूपात प्रकट झाले आहे.

-डॉ. अेकनाथ पगार,

मराठी साहित्यिक व समीक्षक


‘सांगड’ ही डॉ.राजेंद्र मलोसे यांची नवी कादंबरी ग्रामीण वास्तवाच्या विशिष्ट क्षेत्रीय अनुभवावरची गोष्ट आहे. तालुका मुख्यालय असलेल्या बोधवड या खेड्यात नुकताच एम.बी.बी.एस. होऊन आलेला डॉक्टर तरुण वैद्यकीय व्यवसायात शिरतो, तेव्हा काय काय घडते वगैरेंची ही गोष्ट आहे.

‘‘अडचणी सगळ्यांना येतात. नवीन डॉक्टर झालेल्या, एम.बी.बी.एस. डॉक्टरांनाही येतात, त्यात जर का एखाद्या डॉक्टरने नवीन वाट घ्यायची ठरवली तर… त्याला तर वेगळ्या अडचणी येणारच. त्यात त्याला गुरू भेटले आणि जर का ते म्हणाले की, समाजकारण आणि व्यवहार यांची सांगड घालून जग- तर? सांगड घालता घालता किती ठिकाणी, काय काय होतं? डॉ. रमेश तात्यासाहेब कळंबकर यांना काय काय करावं लागतं… याची ही कहाणी… ‘सांगड’!’’

अशी लेखनभूमिका प्रस्ताविकातच सांगून टाकल्याने गोष्ट सारी स्पष्ट होऊन जाते. ‘समाजकारण आणि व्यवहार यांची सांगड’ हे प्रधान आशयसूत्र येथे आहे. लेखक लेखनहेतू सांगतो आणि पुढे कादंबरीही सांगतो. ही एक प्रकारची ‘गृहीतक’ आणि पुढे ‘आशय तपशील’ अशी सांगड आहे. आशय संहिता वाचून मग गृहीतक- सिद्धान्तकथन झाले असते तर? कादंबरीची पूर्ण संहिताच ‘सांगड’ या सूत्रावर आधारलेली. शिवाय ही आवृत्ती तपशील, भाष्ये, संवाद यांमधूनही मधूनमधून झाली आहे. वाचकाचे आकलन पक्के करण्यासाठी ही आवृत्ती झालेली आहे. जरी प्रास्ताविकातच जिज्ञासातृप्ती होते, तरी काय काय होतं? (घटना-कृती-भौतिक-मानसिक) किती ठिकाणी काय काय करावं लागतं? (पात्रकृती) (कथनक्रम), सांगड कशी (पात्रकृती-घटनाक्रम-पात्रसंवाद-पात्रांची भाष्ये-भाषा-उपयोजन) अशी जिज्ञासाही निर्माण होऊ शकते.

2

31 डिसें. 1978 ते 30 जाने. 1979 अशा सामान्यत: महिनाभराच्या काळातला घटनापट येथे आहे. या घटनापटात केंद्रवर्ती पात्र म्हणजे डॉ. रमेश तात्यासाहेब कळंबकर होय. रमेशच्या जीवनात 31 डिसेंबर 1978 पासून महिनाभरात काय काय घडले याच्या नोंदी तृतीय पुरुषी सर्वसाक्षी निवेदकाने केलेल्या आहेत. दिनांक नोंदवल्यामुळे दैनंदिनी – आत्मकथनपर नोंदी असाव्यात असे वाटते. मात्र हे निवेदन आत्मकथनात्मक नाही (तसे झाले असते तर अधिक परिणामकारक आत्मरत – उत्कट कथनानुभव निर्माण झाला असता, केंद्रवर्ती पात्राच्या मानसिक कृतीही समोर आल्या असत्या!) निवेदक बाहेरून कधी घटनापटातून पात्रांच्या कृती- उक्तींचे निवेदन करतो. निवेदकाचे कथनकेंद्र ‘रमेश’ आहे. त्याच्या आत्मपर प्रतिक्रिया, भाष्ये, स्वगते दिली आहेत. केंद्रवर्ती पात्र आणि निवेदक यांची आंतरिक वृत्ती संवादी आहे. काही ठिकाणी निवेदक विसरतो की रमेश हे वेगळे पात्र आहे, कल्पित पात्र आणि निवेदक परस्परांत विरघळतात आणि मग तृतीय पुरुषी निवेदन निस्संदर्भ ठरते. प्रत्यक्षात लेखक, निवेदक व केंद्रवर्ती पात्र हे बहुधा एकच आहेत, हेही वाचकाच्या लक्षात येऊ शकते. आत्मकथनात्मकता आणि बाह्य निवेदनपरता यांच्यातल्या सीमारेषा पुसट होऊन जातात. बोधवड हे धुळे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण खेडेगाव. दुष्काळग्रस्त, गरिबीवर रेंगाळणारे गाव हे कल्पित आहे. ‘बोधवड, बोधवड्या’ हे उल्लेख वारंवार येतात, मध्येच एका ठिकाणी ‘बोधवड’चे ‘चांदवड’ही झाले आहे. चांदवड – अहिल्याबाई मनमाड स्टेशन (मनमाठ्या) चहा, जात्या, येत्या, करत्या असा भाषावापर चांदवड तालुक्यातील खेड्यांची नावे, जैन समाजाची व्यापारी मंडळी, ठळक मुस्लिम वस्ती या साऱ्या खाणाखुणा चांदवडच्या आहेत. मनमाडहून बोधवडला पोहोचणे, जवळचे रेल्वे स्टेशन मनमाड असणे (चांदवड-मनमाड 24 कि. मी.) यावरून स्थलविशिष्टता माहीतगारास लक्षात येते. अर्थातच अमुक एक खेडे असे माहीत नसल्यास काही आकलनात अडचण येत नाही. 1977-78च्या दरम्यानचे खेडेगाव, तेथील वैद्यकीय सुविधा किंवा सरकारी दवाखाना, मोटारसायकलने रुग्णांवर गावोगाव जाऊन उपचार करणे, एम.बी.बी.एस. डॉक्टर नसणे, अर्धवट किंवा ॲलोपॅथीशिवाय इतर समांतर आरोग्यविज्ञान – विधांचे उपयोजन करणे, कामधंदे नसल्याने गप्पा-पत्ते-दारू-भांग असे लोकसमूहजीवन वास्तव समांतर ठरले आहे.

तृतीय पुरुषी निवेदनातही वर्णनामत्मकतेपेक्षा संवादांना अधिक स्थान. घटना-प्रसंगांची रचना करताना ‘आता -इथे’ असा नाट्यदर्शी संवादांना अवसर मिळाला आहे. नैसर्गिक कालक्रम आणि निवेदकाच्या कथनातील कालक्रम क्वचितच बदललेला आहे. प्रारंभी पात्रांच्या पूर्वकृती-स्थान-स्वभाव-काही घटिते आलेली आहेत. उदा., ‘‘समोरून हसमुख आला. बेफिकीर झुल्फे. दोन गुंड्या उघड्या, गळ्यात शबनम बॅग. पायात घासलेली समाजवादी स्लिपर, चमकदार डोळे. तिरपट शत्रुघ्न सिन्हासारखी चाल…’’ हा हसतमुख बोधवडला येण्याचे निमंत्रण देणारा अनेकदा एम.बी.बी.एस.ची परीक्षा देणारा मित्र आहे. हसमुखचे बाह्य वर्तन अत्यंत मोजक्या शब्दांत केलेले आहे. मलोसे यांच्या इतरही कादंबऱ्यांमध्ये अल्पाक्षरी वाक्ये, संवादांची ठळक उपस्थिती, चमकदार भाष्ये, फापटपसारा नाकारणारी निवेदन शैली येथेही आहे. ‘समाजवादी स्लिपर’ ही खास सूचक शब्दसंगती म्हणावी लागेल. निवेदक, केंद्रवर्ती पात्र हे स्वत:लाही समाजवादीच म्हणवून घेतात. हसमुखचे एम.बी.बी.एस. उत्तीर्ण न होताही बोधवड परिसरात रुग्णतपासणी करणे ही कृती काही समाजवादाशी जुळती नाही. बोधवडला मात्र रमेशला हसमुख आपल्या कुटुंबाचाच घटक बनवून टाकतो. ‘बोधवडला ये सर्व मदत करीन,’ हे मात्र पाळतो. हसमुखच्या पूर्व-विचार-कृतीसंबंधींचे निवेदन पाहू-

‘‘त्यातलाच हसमुख… समाजवादी चळवळीत अडकला. अरुण लिमये, कुमार सप्तर्षी यांच्या युक्रांदमध्ये…! ना.ग.गोरे, एसेम, बापू काळदाते, मृणाल गोरे. मृणाल गोरे यांच्या मागे फिरणे… काहीतरी करीत राहणे. चतुर्थवर्ग कर्मचारी यांची संघटना बांधणे… रमेशलाही हाच बाबा आमटेंकडे घेऊन गेला. रमेशला ते… ते… बाबा आमटे यांचं कार्य फारच आवडलं. तेही आनंदवनातली शबनम बॅग घेऊन, काही समाजवादी विचार घेऊन फिरायला लागला. त्याची संवेदनशीलता वाढीला लागली. चळवळीत भाग घेऊ लागला.’’ (पृ. 22) हसमुखच्या पूर्वकृती आणि विचारांसंबंधीचे हे संक्षिप्त स्पष्टीकरण तर आहेच, पण चळवळी- समाजवादी विचार यांचे संस्कार केंद्रवर्ती पात्र रमेशवरही पडलेले आहेत, हेही समोर येते. नामांतर चळवळ, दुष्काळ, जनता पक्ष या पूर्व घटितांशी रमेश, हसमुख व इतर शिक्षित तरुण यांचा संबंधही लक्षात येतो. याच काळात बाबा आमटे प्रभृतींच्या सामाजिक कार्यात मराठी तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी होत. ध्येयवादी होणे, आपल्या कृती-विचारांशी आणि समाजाशीही बांधील असणे, चळवळी-मोर्चे, पुरोगामी कृती यांचे तरुणाईत आकर्षणही होते. म्हणजेच समकाळात रमेश -हसमुख-समाजवादी किंवा कोणत्याही पुरोगामी विचार चळवळींचे अस्तित्व स्वप्नवत ठरेल की काय?

रमेश एम.बी.बी.एस. झाल्याबरोबर बाबा आमटेंकडे जातो, ते सांगतात, ‘‘हे महारोगी समाजात परत गेले पाहिजेत. समाजाला महारोग झालाय. समाजाचा महारोग बरा करण्यासाठी काहीतरी काम कर… तुझ्यासारख्या डॉक्टरने लहान खेड्यात गेलं पाहिजे. स्वत:चं जग निर्माण केलं पाहिजे. खूप काम केलं पाहिजे…’’ (पृ. 30) रमेश अर्थातच बोधवडला जातो, तेव्हा समाजवादी जीवनसूत्रे, बाबा आपटे-प्रकाश आमटे-विकास आमटे -पुरोगामी विचार त्याच्या सोबतच असतात. रमेशच्या नैतिक भूमिकांची ही आधारभूमी आहे. जेव्हा जेव्हा नैतिकता आणि प्रत्यक्षात स्थिती-व्यवहार यांच्यात अंतर पडते तेव्हा तेव्हा त्याला हे सारे सारे जागे ठेवते, मूल्यऱ्हासांपासून वाचवते. केवळ नैतिकता, साधनशुचिता, नि:स्वार्थ समाजसेवा किंवा समाजवादी विचार यांचे संपूर्ण पालन शक्य आहे का? ज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहारी जग, या जगाचे पूर्वग्रह, लोकप्रिय समूह-आकलनेे यांच्यातील अंतर कसे संपणार? या कादंबरीतून हे नैतिक मूल्यसंघर्षाचे क्षण नाट्यात्मक कथनातून जिवंत झालेले आहेत.

‘समाजकारण आणि व्यवहार यांची सांगड, खेड्यात जा, बाबा आमटे’ याची पुरेपूर आवृत्ती कादंबरीच्या संहितेत होत राहते. समाजवादी विचारातून समाजकारण करायचे तर प्रत्यक्ष व्यवहार – प्रत्यक्ष वास्तव अगदीच वेगळे! खेड्यात जाऊन आरोग्य सेवा द्यायची तर स्वार्थ-पैसा-गल्ला-वैद्यकीय ज्ञान यांना किती स्थान द्यायचे? प्रत्यक्ष परिस्थिती, रुग्णांचे अज्ञान -दारिद्र्य, आरोग्यसुविधा-साधने यांची कमतरता यांचा सामना कसा करणार? विनातिकीट प्रवास करून मुंबईच्या स्टेशनात आल्यावरही प्रश्न आहेच – तिकीट कलेक्टरला चकमा कसा द्यायचा! आपण समाजवादी आहोत ही एक बाजू आणि नोकरी नसल्याने तिकीट काढायला पैसे नाहीत ही दुसरी बाजू! निवेदक – रमेश हे दोघेही तत्त्व आणि व्यवहारी वास्तव यांच्यात संतुलन करू पाहतात. तरीही असे सारखे वाटत राहते की, आपला ध्येयवाद, समाजवादी विचार, सांगड घालण्याची आवश्यकता – आमटे कुटुंबीय यांबद्दलची आवृत्ती कथनात वारंवार नसती झाली तर? एक मात्र खरे की, निवेदनातील स्वगत-संवादांनी कथनक्रम आणि घटनाक्रम सतत गतिमान राहतो उदा.,

‘‘काय करतोय आपण! नक्की काय करतोय आपण?’’

‘‘बाबांनी सांगितलं खेड्यात जा. कसं जायचं?’’

‘‘मुंबईला गेलो, बाई पैसे मागते.’’

डॉक्टर म्हणून प्रस्थापित करणे वगैरे कृती भाऊ, बाबाजी, आमदारांचे कार्यकर्ते, स्थानिक इतर लोक करतात. सामान्यत: महिनाभराच्या काळातली ही उभारणी आहे. एम.बी.बी.एस. डॉक्टर बोधवडसारख्या खेड्यात येणे ही या सर्व मंडळींना चकित करणारी घटना ठरते. महिनाभरातल्या घटनाप्रसंगांतून, संवादी- विसंवादी कृती-उक्तींमधून कादंबरीचे कथानक घडवलेले आहे.

3

रमेश या पात्राइतकेच हसमुखचे जैन मारवाडी कुटुंब संक्षेपाने- पण स्पष्ट असे चित्रित झाले आहे. हसमुखच्या कुटुंबाचा रमेश भाग बनतो. ही सारी जैन मंडळी जन्मजात विनय आणि आपुलकीने रमेशला आश्रयही देतात आणि दवाखाना, रुग्णसेवा उभारणीत सहभागी होतात. हसमुखचा मोठा भाऊ नेमीसेठ उर्फ भाऊ सर्वच जबाबदारी स्वीकारून रमेशची उभारणी करतो. बन्सी हा हसमुखचा लहान भाऊ प्रारंभी काहीसा विक्षिप्त आणि हसमुखबद्दलचा पराकोटीचा राग प्रकट करतो, पण दवाखान्याच्या उद्‌घाटनाच्या वेळीच त्याचे मेडिकल स्टोअर्सही उभे राहू शकते या जाणिवेतून सौम्य बनतो. मारवाडी जैन समाजाची कुटुंबचित्रणाची वैशिष्ट्यपूर्णताही लक्षात येते. हसमुखच्या कुटुंबातच राहणे-खाणे असल्याने जैन समाजाच्या कौटुंबिक स्थितीचं चित्रण रमेशच्या नजरेतून झाले आहे.

‘एक ढेरपोट्या, पांढरे कपडे घातलेला, चपचपीत तेल लावून केस बसवलेला, लेंगा-पायजमा, गुरुशर्ट घातलेला इसम पान चघळणारा’ हा भाऊ. भाऊ सतत आमदाराबरोबर असणारा, साहाय्यक म्हणून वावरणारा मुख्य म्हणजे फारच मोकळा- पण सकारात्मक माणूस आहे. रात्री  मात्र दारूत सारे विसरणारा, दिवसाचा भाऊ परिवर्तित झालेला! जैन समाजात दारू-हिंसा यांना स्थान नाही, तसेच रागावणे-चिडणे नसते. भाऊच्या आमदार संसर्गामुळे दारूचा प्रवेश झालेला असावा. आमदारही जनसंघाचे. त्यांना बी म्हणायचे, ते आता बबनराव झालेले! आमदाराच्या साहाय्यकाच्या भूमिकेमुळे भाऊला लोकमान्यताही होती. रेडिमेडच्या दुकानाकडे मात्र भाऊचे लक्ष नाही. हसमुखने बोधवडला बोलावले असले तरी ‘‘सगळं भाऊ करतील. सध्या ते फारच उत्सुक आहेत, मदत करायला,’’असंही हसमुख सांगतो. भाऊंच्या पत्नी मोठ्या भाभी- तीन मुले स्वतंत्र पण एकाच घरात वरच्या मजल्यावर राहतात, समोरच्या खोलीत स्वतंत्रपणे हसमुख आणि त्याची पत्नी सुमन राहते. बन्सीचे लग्न झालेले नाही. पूर्वीचे वैभव या कुटुंबात उरलेले नाही, पण व्यवहारवादी दृष्टिकोन सुटलेला नाही. सुमनचे वडील आणि भाऊचाही ‘मारवाडी भेजा!’ हसमुखचा विवाह होताना दोघांनीही ‘मारवाडी भेजा’ वापरला. विवाह झाला. सुमन मात्र हसमुखच्या एम.बी.बी.एस उत्तीर्णतेसाठी सारखी त्याला प्रवृत्त करते. तिच्या मते हसमुख ‘कसले समाजवादी? वरून दाखवायला आहेत.’ बाई म्हणजे हसमुखची आई आणि भावसा म्हणजे वडील या पात्रांचे चित्रण मात्र अत्यंत उत्कट-पारदर्शित्व सिद्ध करणारे आाहे. भावसांचं स्वप्न होतं- ‘पोरगा डाक्टर होईल, घणो माल कमवेल.’ पण हसमुख वेगळा वाटतो. ‘जातिवंत व्यापारी हे लोक. यात हसमुखच वेगळा… समाजवादी निपजला… अर्थात काही अपवाद आहेतच. सुगन बरंठ, पन्नालाला सुराणा…’’ अर्थात हे निवेदकाचे अप्रत्यक्षपणे रमेशचे आकलन आहे. जातिवंत व्यापार आणि समाजवादी तत्त्वव्यवहार हे सारे परस्परविरोधी ठरतात. जैन मारवाडी शोषकच असतात, असे नव्हे! पण व्यापार म्हटले की नफा-आर्थिक स्वार्थ हे सारे येणारच! अपवाद म्हणून सुगन बरंठ – पन्नालाल सुराणा यांचा नामनिर्देश निवेदक करतो. हे ध्येयवादी, त्यागी, विचारवंत आणि समाजवादाचे अनुसरण करणारे उदारमतवादी होत.

मारवाडी समाजातील खाद्यसंस्कृती, प्रथा, स्त्रीविषयक दृष्टी, व्यापारी जीवनदृष्टीदर्शक घटना-प्रसंग -रमेशचे अनुभव वगैरेंमधून हे समाजचित्रण झालेले आहे.

हसमुखचे वडील भावसा, बाई (आई) यांनीही रमेशला कुटुंबात सहभागी करून घेणे, बाईने अपत्यवत प्रेम करणे, क्वचित मन मोकळे करणे या घटनाही पात्रस्वभाव आणि मारवाडी समाजातील आस्थाभावदर्शक आहेत. एम.बी.बी.एस. डॉक्टर हा चांगला ‘गल्ला’ गोळा करू शकेल यावर विश्वास असणे, पैशाचे, कमाईचे महत्त्व असणे, यामधून व्यावसायिक दृष्टीही प्रत्ययास येते.

बाबाजी हे पात्र तर विलक्षण वाटावे असे आहे. मारवाडी समाजाचे औदार्य व सेवावृत्तीचे निदर्शक आहे. भांग घेणे, क्वचित मद्य प्राशन करणे – अलिप्त बनणे, सामाजिकता जोपासणे, रमेशला स्वत:चा मुलगा मानून दवाखाना-जागा-मदतनीस मिळवून देणे, दुचाकी मिळवून देणे, स्थिरस्थावर करण्याची स्वत:हून जबाबदारी घेणे या कृतींमध्ये बाबाजींचे वेगळेपण लक्षात येते. पदरमोड करण्यास सदैव तयार असणे, आमदाराचा आणि सर्व समाजघटकांचा आदरपात्र ठरणे वगैरे कृतीही मूल्यदर्शक ठरतात. ‘‘मला सेवा द्यायची आहे. पैशाचा प्रश्न नाही. खेड्यात सेवा देणे हे ध्येय ठरलं माझं,’’ ही रमेशची विचारदृष्टीही बाबाजींना त्याच्याकडे आकर्षित करणारी ठरली असावी.

‘‘सतत काहीतरी धंदो, व्याप. आता हे आश्रमाचं लावून घेतलंय, आश्रम, ग्रामपंचायत, मर्चंट बँक, सगळीकडे जात्या की आश्रमाचं जास्तच आहे. घणो काम. येथे खूप मोठा आश्रम काढलाय, त्याचे सेक्रेटरी आहेत… गरिबाचे पोरं आणत्या. त्यांना ठेवत्या. त्यांना शिकवत्या, त्यासाठी पैसे जमा करत फिरत्या…’’

बाबाजीच्या पत्नी काकीजींनी रमेशला दिलेली ही बाबाजीची माहिती म्हणजे बाबाजीचा समाजमनस्क स्वभाव सांगणारी आहे. बाबाजी-काकीजी यांना पोरबाळ नाही. एकत्र कुटुंब… सगळ्या भावांची, पुतण्यांची जबाबदारी बाबाजीवरच. बाबाजीशी पहिल्या भेटीतच रमेश चकित होतो. ‘‘आश्रम काढलाय एकीकडे आणि एकीकडे भांग घेतात. दारूही पीत असावेत. तिसरीकडे सांगतात- तुम्ही माझा मुलगा. औषधपाणी करा. तुमचा दवाखाना इथे झालाच पाहिजे. रमेश चक्रावला.’’ येथील आमदार जनसंघ-शाखा-जनता पार्टी असा प्रवास करणारे पात्रही बाबाजीच्या अभिजात श्रीमंतीचा-संस्कार क्षमतांचा, आदर करतात. तालुक्यात एम.बी.बी.एस. डॉक्टर यावा याचे त्यांना अगत्य आहे. आमदार म्हणतातही, ‘‘माझे कार्यकर्ते माझा प्रचार करतात, पण मी आता तुमचा (रमेश- एम.बी.बी.एस.डॉक्टर) प्रचार खेड्यापाड्यांमध्ये करीन.’’

रमेशला डॉक्टरकी सुरू करताना अडचणी असल्या तरी अडचणी सोडवणारेही अनेक लोक आहेत. बाबाजी, हसमुखचे कुटुंब, गावकरी, आमदारांचे कार्यकर्ते, स्थानिक लोक – खेड्यावरचे आरोग्य सेवेपासून वंचित असणारे लोक हे सारेच मदत करतात.

तालुकावजा खेडेगावाची मदतीच्या बाबतीतील संघभावनाही महत्त्वाची आहे. अर्थातच 1977-78 च्या काळातले हे लोकजीवन – लोकस्वभाव आहेत. हा काळ काही आजच्याइतका तुटकाफुटका-आत्मकेंद्री -असंवेदनशील नव्हता! ध्येयवादी सेवाभावी एम.बी. बी.एस. डॉक्टर, तत्त्वनिष्ठ- पण समाजशील डॉक्टर हाही काळाचा महिमाच म्हणावा लागेल.

दवाखाना उभारणीत अडचणी आल्या तरी अडचणीतच गुंतून पडण्याचा रमेशचा स्वभाव नाही, शिवाय अडचणीतून सुटका होताना लोकसमूहमानसही साह्यकर्ते ठरलेले दिसते. जागा, साधनसामग्री, अव्यवस्था, लोकांचे दारिद्र्य, खेडुतांच्या अंधश्रद्धा- पूर्वग्रह वगैरे अडचणी रमेशला येतात. इंजेक्शन देणे, स्वत:च्या दवाखान्यातून गोळ्या देणे, तातडीने बरे करण्याची रुग्णांची अपेक्षा असणे, सलाइन लावा- दोन दोन इंजेक्शन द्या, असे रुग्णांनीच डॉक्टरला औषधोपचार करायला भाग पाडणे, खाली बसून रुग्ण तपासणी करणे अशा अडचणीतून मार्ग काढताना रमेशला तडजोडी कराव्या लागतात. वैद्यकीय शिक्षणात या अडचणींचा अभावग्रस्त परिस्थितीचा काहीही विचार नसतो. वस्तुस्थिती आणि सैद्धान्तिक ज्ञान यांच्यातले हे अंतर मिटता मिटत नाही. रचना क्लिनिक सुरू करण्याचा बेत आखला तेव्हा पारखे सर म्हणतात, ‘‘तुझ्याकडे किती पैसे येतील हे महत्त्वाचं नाही. तू खेड्यात राहणार आहेस. तिथे रुग्ण तुझ्यावर विश्वास दाखवणार आहेत. हे महत्त्वाचं आहे.’’ (पृ. 135) तर स्वप्नात बाबा आमटे सांगतात, ‘‘पैशाकडे पाठ फिरव. आपोआप पैसा मागे येईल.’’ ‘समाजसेवा-रुग्णसेवा- आरोग्य वर्धन’ हे खेड्यातले समाजकारण रमेश करू इच्छितो. कोणतेही आर्थिक व्यावहारिक भांडवल नसताना हे सारे करणे तसे अशक्यच होते. नवे क्लिनिक- दवाखाना-नवे खेडेगाव या पार्श्वभूमीवर ‘पैसा’ महत्त्वाचाच असतो. समाजकारणात ‘पैसा’ ही प्राथमिक गुंतवणूक म्हणून हवा असतो. जागा, फर्निचर, वैद्यकीय साधने-तंत्रज्ञान, औषधे, सहायक वेतन वगैरेंना तातडीने पैसा हवा असतो. रमेश पैशाच्या बाबतीत उदासीन राहू शकणार नसतो. माफक, उचित रुग्ण फी घेऊनच त्याला हे समाजकारण करावे लागणार असते! समाजकारण आणि व्यवहार यांची सांगड घालताना औचित्य, विवेक, प्रसंगी साधनशुचिता पाळून तडजोडीही कराव्या लागतात, या तडजोडींना मानुषतेचा आधार, संवेदनशीलतेचा करुणेचा स्पर्शही द्यावा लागतो.

4

‘‘हसमुखच्या, बाबाजीच्या, भाऊच्या मदतीने मी सांगड घालतोय समाजकारण आणि व्यवहार यांची… त्या बोधवडात वामन्याकडे व्हिजिटला जाणं, हे माझं समाजकारण आहे… त्याने दिले तर पैसे घेणं हा माझा व्यवहार आहे. आले पैसे तर कर्ज फेडणं ही मी घातलेली दोघांची सांगड आहे… समाजकारण आणि व्यवहार यांची सांगड घालून जगलंच पाहिजे मला. डॉक्टर म्हणून… मी डॉक्टर आहे… सांगड घालणारा… माणूस नाही, देव नाही, राक्षस नाही… सांगड घालणारा डॉक्टर आहे. (पृ. 365)

त्या मनोगतातून रमेशची भावी वाटचाल निर्धारित होते. पण कथानकातील काळ महिन्याभराचा आहे. सांगड घालण्याच्या घटितांचे प्रमाणही मर्यादित आहे. वर्तमान वास्तव विचारात घेतले तर डॉक्टरांचे भावविश्व, जीवनदृष्टी, शिक्षणविषयक दृष्टी, भौतिक परिस्थिती यांत मोठेच अंतर पडलेले दिसते. पण 40-42 वर्षांपूर्वीची नव्या ध्येयवादी डॉक्टरची जीवनदृष्टी- सांगड घालण्याची जिद्द मात्र महत्त्वाची वाटते. तत्कालीन सामाजिक परिस्थिती-विविध समाजघटक-गट यांतील गुंतागुंत, स्तरभेद यांचे लेखकाचे आकलन ढोबळ असण्याचीही कथाशयाची मर्यादा आहे. मुस्लिम- मारवाडी-ग्रामीण शेतकरी समाजजीवन, आमदाराचे राजकीय जीवन, मारवाडी कुटुंबसंस्था यांचे बाह्य दर्शन या कादंबरीतून घडते. स्त्रीजीवनही क्षीण स्वरूपात प्रकट झाले आहे. हसमुखचे कुटुंबीय, बाबाजी, इतर डॉक्टर, कार्यकर्ते, खेडूत रुग्ण, आमदार, महाराज, या गौण पात्रांना कथानकात पूरक म्हणूनच वावरावे लागले आहे. फक्त रमेश आणि त्याची जीवनदृष्टी यांनाच केंद्रवर्ती मानून कथानकाची रचना झाली असल्याने समष्टी-लोकजीवन यात सूक्ष्मता नाही. दिनांकनिहाय घटनापट तृतीय पुरुषी निवेदक सांगतो, त्यामुळे दैनंदिनी आत्मकथनात्मकता येथे नाही. विशिष्ट विचारसूत्राला केंद्रस्थानी आणून या कादंबरीची निर्मिती झाली आहे. गतकालीन समाजवास्तव लेखकाला मांडायचे आहे. समाजवाद, आदर्श व्यक्ती-समाजसुधारक बाबा आमटे, वि. वि. चिपळूणकर यांची वैचारिकता- कृतिपरायणताही आठवून आठवून सांगायची आहे, असे दिसते. सध्याच्या काळात हे सारेच संस्मरणीय आणि प्रेरक आहे, म्हणून ‘सांगड’ची ओळख आवश्यक ठरते.

सांगड
लेखक : डॉ. राजेंद्र मलोसे
देशमुख आणि कंपनी, पुणे
पृष्ठे : 355, मूल्य 500 रुपये

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सांगड (कादंबरी ) लेखक डॉ. राजेंद्र मलोसे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Menu