Description
वेदनेचे काटे : माणुसकीचा शब्द पेरणारी कविता.
समाजव्यवस्थेची बिघडलेली घडी नीटनाट करण्याचं हत्यार कोणतं असेल, तर ते म्हणजे कविता. पण या हत्याराची ताकद सगळ्यांनाच कळते असे नाही; ज्यास कळली तो या हत्याराचा वापर अतिशय योग्य पद्धतीने करतो. कवी सोमनाथ पगार यांच्या ‘वेदनेचे काटे’ संग्रहातील कविता वाचल्यानंतर हे प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही. कवी सोमनाथ पगार यांच्यातील कवीने समाजातील भेदाभेद, अराजक, एका बाजूला भुकेकंगाल माणूस तर दुसरीकडे गर्भश्रीमंती यातील विषमता जाणली आहे. जागतिकीकरणाच्या लाटेत संपून गेलेली माणसा-माणसातली माणुसकी याने समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. मूल्य व्यवस्था गहाळ होऊन माणूस माणसापासून दूर जातो आहे. याने कवी व्यथित आहे. त्यामुळेच या कवीची भाषा विस्कटलेल्या समाजाला सांधण्याची आहे. माणुसकीची भाषा बोलणारा हा कवी म्हणूनच आपल्या कवितेतून लिहून जातो,
माणुसकीचे आम्ही पुजारी
माणसाला सांधू
माणसात या देव वसे हो
आनंदाने नांदू
माणुसकीचा पुजारी तोच माणूस होऊ शकतो, जो संवेदनशील आहे. ज्यास दुसऱ्याच्या दु:खाविषयी सहानूभाव आहे. सोमनाथ पगार यांच्यातील कवी कमालीचा संवेदनशील आहे. त्यामुळेच समाजातील अशा गोष्टीचा तपास घेऊ शकतो. तो तपास घेताना लयात्मकतेचा वापर कवी करतो. थोडक्यात व्यथा, वेदनासुद्धा हा कवी गाऊन सांगतो, याचे कारण त्यांच्यातील गीतकार. आणि वेदना गाता येते हे आपल्याला जात्यापाळी लोकगीत म्हणणाऱ्या आयाबायांनी सिद्ध करून दाखवलंच आहे. कवी कृषीसंस्कृतीतून आला असल्याने त्याच्याकडे गीताचा वारसा उपजतच आहे.
काफ्का या जर्मन लेखकाने फार मौलिक विचार मांडून ठेवले आहे. काफ्का म्हणतो, ‘ज्यानं फक्त आनंद मिळतो असंच लिहू नये. असं लिहिल्यानं काय फायदा? ज्या लिखाणामुळे आपल्याला खोल जखमा होतात, दु:ख होतं आणि ज्यामुळे आपण खडबडून जागे होतो, असंच लेखन आपण नेहमी करावं. मनातल्या गारठलेल्या बर्फासाठी चांगलं लिखाण हे कुऱ्हाडीसारखं असावं. एखाद्या मोठ्या संकटानं, मृत्यूनं, आत्महत्येनं किंवा प्रचंड एकाकीपणानं आपण जसे बेचैन होतो, तशी बेचैनी आपल्यात निर्माण करणारं आपलं लिखाण असावं.’ हे विचार इथे मुद्दाम आठवण्याचं कारण म्हणजे सोमनाथ पगार यांच्या कविता संग्रहाचे नावच आहे, ‘वेदनेचे काटे.’ वेदनाच्या नाभीतूनच साहित्याची निर्मिती होत असते. सोमनाथ पगार यांची कविता यास अपवाद नाही. कवीने वेदनेचा शोध घेतला आहे म्हणूनच कवी म्हणतो,
काळजाला टोचे वेदनेचे काटे
जगाचे व्हेवार सारे उफराटे
जखमांचे व्रण उरी पोसलेले
जसे पंचप्राण घाव सोसलेले
खरंतर ही संपूर्ण कविताच वेदनेचे रुप आपल्यासमोर ठसठशीतपणे उभे करते. नुसता वेदनेलाच कवी भिडतो असेही नाही. समाजातला अज्ञानाचा अंधार पाहून कवी नुसता बसून राहत नाही, तर थेट शिक्षणाचं खुरपं हातात धरतो. कारण कवीला माहिती आहे, की अज्ञानाचं तण जर खुरपून टाकायचं असेल, तर शिक्षण हाच त्यावरील रामबाण उपाय आहे.
घावलंय आता आम्हा अवजार
मशागत करू तनामनाची
कात टाकून झटकू जळमटं
नवी पहाट सुख समृद्धीची
कवीला कुठलाच विषय वर्ज्य नाही. त्यामुळे त्याची कविता एकसुरी होत नाही. ती माणसाच्या भावविश्वाला चहुबाजूने भिडते. ती कृषीजन संस्कृती जशी मांडते तशीच कामगारविश्वालाही भिडते. त्यामुळेच कवितेच्या निरनिराळ्या तऱ्हा आपल्यासमोर उभ्या करते. ज्याने आपल्याला या विश्वाशी जोडून दिले त्या आईवडिलांना कवी कसा विसरू शकेल? त्यासंदर्भात मला इथे कवीचे ‘जन्मदाते देवरुप’ ही कविता महत्वाची वाटते. सदर कवितेतून कवी ज्या सहजतेनं आई-बापाचं रुप आपल्या डोळ्यासमोर उभं करतो, त्यास तोड नाही. ही संपूर्ण कविताच मला महत्वाची वाटते. वानगीदाखल ओळी इथे ठेवतो त्यावरूनच आपणास अंदाज येईल.
बाप आभाळाची छाया
माय धरतीची माया
पिलांसाठी मायबाप
जसा जीवनाचा पाया
किंवा
बाप मैलाचा दगड
ताठ मणक्याचा कणा
माय भरविते आम्हा
रोज अमृताचा पान्हा
‘वेदनेचे काटे’ संग्रहातून जागोजागी आपल्याला अशा आशयपूर्ण कविता भेटत जातात. कवी सोमनाथ पगार यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे असे वाटत नाही. याचे कारण त्यांनी आपल्या अनुभवाला मुरु दिले आहे त्यामुळेच त्यांना चांगली कविता समोर ठेवता आली, त्यामुळे नवखेपणाच्या खुणा विशेष जाणवत नाही. कवितेत आलेल्या प्रतिमांनी कवितेचे सौंदर्य वाढवलेलं आहे. कवीने स्वत:ची अशी भाषा घडवली आहे, त्यामुळेच ‘वेदनेचे काटे’ कवितासंग्रहातील कविता वाचकांना निश्चितच आवडेल. कारण ही कविता माणुसकीचा शब्द पेरणारी आहे. म्हणूनच या कवितेचं रसिक वाचक आनंदाने स्वागत करतील, अशी आशा वाटते.
ऐश्वर्य पाटेकर.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेता कवी









प्रशांत वाघ –
अतिशय सुबक आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ … वेदनेतून साहित्याची निर्मिती होत असते … खूप छान