Description
ऐश्वर्य पाटेकर याचा “कासरा” हा कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.
“भुईशास्त्र” या त्याच्या पहिल्या कवितासंग्रहाची दखल मराठी कवितेत घेतली गेली. त्याला साहित्य अकादमी नवी दिल्ली यांचा युवा साहित्य पुरस्कार लाभला होता. भुईशास्त्रानंतरची कासरा ही निर्मिती आहे. “मी माझ्यात अख्ख गाव घेऊन फिरतोय…” या एकाच ओळीतून त्याची ग्राम संस्कृती विषयीची अनुभूती लक्षात येते. “वावराचं मृत्युपत्र” असा दुसरा विभाग या संग्रहात आहे. त्यातून विस्कटलेल्या कुणब्याच्या दुःखाचं कथन कवीने केले आहे. “कसं मूळ धरू या मातीत”, ” मी माझी कविताच करू परत करू इच्छितोय” असे विविध आयाम या संग्रहात आहेत. कवितेत कवी प्रतिमांच्या आधारे व्यक्त होत असतो. आपल्या ग्राम संस्कृतीतील शब्द प्रतिमा आणि मानवी जीवन याच दर्शन या कवितातून होईल. अल्पाक्षर रमणीयत्व हे कवितेचे वैशिष्ट्य असतं. या कविता संग्रहाविषयी अधिक गंभीरपणे मी लिहिणार आहे. तरीसुद्धा त्यातील एक कविता या ठिकाणी सांगितल्याशिवाय राहवत नाही.
बंदूक
त्यांनी हातातून भाकर काढून घेत
ठेवली बंदूक हातावर
मी नेम धरून भुकेवर झाडली गोळी…!
( पृ.१२१ )
कासरा या कवितासंग्रहाचे मराठी कवितेत स्वागत होईल अशीच निर्मिती या संग्रहाची झालेली आहे. राजन गवस यांनी कासराची पाठराखण केली आहे. कवितेच्या नादीवाचकाने आपल्या ग्रंथ संग्रहात हा कवितासंग्रह ठेवावा. कारण विस्कटलेल्या गावाच्या, ग्रामसंस्कृतीच्या खुणा त्याच्या पानापानात दिसून येतात. भाषिक दस्तऐवज म्हणूनही या संग्रहाची दखल घेतली जाईल, असा विश्वास वाटतो.
डॉ शंकर बोऱ्हाडे






पुस्तक – कासरा


Reviews
There are no reviews yet.